ना. शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्याला यश; यंत्रसामग्री खरेदीचा मार्ग मोकळा
सातारा : माणदेश नगरी प्रतिनिधी
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लवकरात लवकर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होऊन सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. त्यांच्या या पाठपुराव्याला आणखी एक महत्त्वपूर्ण यश मिळाले असून, मेडिकल कॉलेजच्या बालरोग चिकित्साशास्त्र विभागासाठी आवश्यक यंत्रसामग्री व साधनसामग्री (टर्न-कीसहित) खरेदी करण्यासाठी तब्बल १३ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागामार्फत या निधीस नुकतीच प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे सातारा मेडिकल कॉलेज व रुग्णालयातील बालरोग चिकित्साशास्त्र विभाग, विशेषतः एनआयसीयू विभागासाठी आवश्यक अत्याधुनिक यंत्रसामग्री व साधनसामग्री उपलब्ध करून देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सातारा मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाच्या विविध इमारतींची कामे पूर्ण करून सर्व विभाग पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजित पवार तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत.
मेडिकल कॉलेज सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील रुग्णांना विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. बालरोग विभागासाठी आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध झाल्यामुळे नवजात बालके आणि गंभीर आजारी बालकांना आवश्यक उपचार सुविधा अधिक सक्षमपणे उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
“सातारा मेडिकल कॉलेज व रुग्णालय लवकरात लवकर सुरू होऊन त्याचा लाभ जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांना मिळाला पाहिजे. त्यासाठी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय सर्व आवश्यक सोयी-सुविधांनी परिपूर्ण होणे गरजेचे आहे. यासाठी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे,” असे ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केले.
या निधीमंजुरीबद्दल ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजित पवार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे आभार मानले आहेत. सातारा मेडिकल कॉलेजच्या बालरोग विभागाला मिळालेला हा निधी जिल्ह्यातील आरोग्य सुविधांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.
